पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील मोरवाडी येथे भंगार मालाला बुधवारी लागली होती. या आगीत मोठे नुकसान झाले. ही आग विझत नाही तोपर्यंत चिंचवडमध्ये रविवारी सकाळी आगीचे तांडव बघायला मिळाले. या आगीत प्लंबिंग साहित्याचे गोदाम, जेसीबीसह सात वाहने जळून खाक झाली.
काळेवाडी आणि चिंचवडजवळील एमएम चौक यांना जोडणाऱ्या पवना नदीवरील पुलालगत केशवनगरमध्ये रस्त्याच्या कडेला गोदाम होते. त्यात सर्व प्लंबिंगचे साहित्य होते. बाहेर चार दुचाकी, एक मोटार, एक टेम्पो व एक जेसीबी उभा होता. या सर्व साहित्यासह गोदाम व कार्यालय जळून खाक झाले.
या गोदामाला लागून काही पत्राशेडची दुकाने आहेत. रस्त्याच्या कडेला थाटलेली नर्सरी, माठ व शीतपेय विक्रीची दुकानेही असतात. सकाळी नऊच्या दरम्यान आग लागली. आगीच्या ज्वाळांमुळे चिंचवडगाव ते काळेवाडी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनाही धग लागत होती.
आगीने उग्र रूप धारण केले. महापालिका अग्निशामक दलाच्या प्राधिकरण उपकेंद्रातील एक बंब व पाच कर्मचारी आगीबाबत कळल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचे स्वरूप पाहून त्यांनी आणखी बंब व जवान बोलविले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.