पुणे : डॉक्टर असलेल्या तरुणीचा पाठलाग करुन, अश्लील हावभाव करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार वारजे परिसरात बुधवारी (ता. २१) रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडला होता. माई मंगेशकर हॉस्पीटलच्या शेजारील होस्टेल परिसरात ही घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध पोलीस घेत होते. अखेर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करुन विनयभंग करणाऱ्या तरुणाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

व्यंकटेश त्रिंबक फोपळे (वय- १९, रा. साई कॉलनी, आम्रपाली हॉटेलजवळ, वारजे, मूळ रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉक्टर असलेल्या २६ वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विजय भरुक व अजय कामठे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी वारजे माळवाडी भागातील आम्रपाली हॉटेलजवळील लोढा हॉस्पिटलच्या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याचा शोध घेऊन गुन्ह्यात अटक केली आहे.
या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार करीत आहेत.







