Paud News : पौड, ता. 29 : सोशल मीडियावरील फसवणूक आणि जादूटोण्याच्या आमिषाने एका सुशिक्षित तरुणीचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणाचा छडा लावत पौड पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. तरुणीला मानसिक छळ करत पैशांची उकळपट्टी करणाऱ्या राजस्थानमधील टोळीतील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

किशन ईश्वरचंद लखारा (वय २२) आणि सुनील रामेश्वर भार्गव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील कोळवण येथील रेणुका लिखिते (वय २५) ही एम.ए. (बासरी वादन) शिक्षण घेणारी, अभ्यासू व सर्वांमध्ये मिसळणारी विद्यार्थिनी होती. ती चिन्मय विभूती आश्रमातील महिला वसतिगृहात राहत होती. मात्र सोशल मीडियावरून संपर्कात आलेल्या अज्ञात व्यक्तींनी “जुने प्रेम परत मिळवून देतो” अशी भूलथाप देत तिची फसवणूक केली.

आरोपींनी तिला स्मशानात जाऊन पूजा करण्याचे सांगत जादूटोण्याच्या नावाखाली मानसिकरीत्या जखडून ठेवले. या प्रक्रियेसाठी त्यांनी वेळोवेळी सुमारे ७४ हजार रुपये ऑनलाइन माध्यमातून उकळले. एवढ्यावर न थांबता आरोपींनी तिच्या आई-वडिलांचे तसेच प्रियकराचे अनिष्ट होईल, अशा धमक्या देत आणखी पैशांची मागणी केली. सततच्या मानसिक दबावामुळे त्रस्त झालेल्या रेणुकाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहार आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, ही फसवणूक करणारी टोळी राजस्थानमधून कार्यरत आहे.
यानंतर पोलिसांचे पथक थेट बीकानेर जिल्ह्यातील नोखा येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने किशन ईश्वरचंद लखारा (वय २२) आणि सुनील रामेश्वर भार्गव या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुण्यात आणण्यात आले असून, न्यायालयाने २ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमे, महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित बँकांकडून व्यवहारांची माहिती मागवली असून, आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सदरची कामगिरी जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उप अधीक्षकसुनील कुमार पुजारी, पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, पोलीस उपनिरीक्षक संजय शेंडगे, समीर शेख, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, सिद्धेश पाटील , ईश्वर काळेम संतोष कालेकर, हनुमंत शेंडगे, अतुल डेरे, पोलीस अंमलदार आकाश पाटील, बाबा पाटील, प्रियांका दिवटे, चेतन पाटील, चिराग गोनते, संकेत जाधव व भरत मोहोळ यांच्या पथकाने केली आहे.







