पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे काही संशयास्पद सोशल मीडिया चॅट्स पोलिसांच्या हाती लागले असून, यामुळे तपासाची दिशा बदलली आहे. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलीस आता हत्येचा कट आधीपासूनच रचला गेला होता का, यादृष्टीने सखोल चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिया गोयलचे तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे स्नॅपचॅटवरील संभाषण समोर आले आहे. यामध्ये तिने एका मैत्रिणीकडे तिचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड मागितल्याचे उघड झाले आहे. या चॅटमध्ये तिने, “तुझे आधार कार्ड पाठवून दे, लग्नाचे तिकीट काढायचे आहे. लग्न होणार नाही, तरीही तिकीट काढून ठेवते,” असा खळबळजनक मेसेज केल्याचा दावा केला जात आहे. या कोडवर्ड आणि संशयास्पद संभाषणाने पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे.

याशिवाय पोलिसांना सियाचा दुसरा मोबाईल फोनही सापडला असून, त्यातील चॅट्स आणि सांकेतिक भाषा पाहून अधिकारीही चकित झाले आहेत. सध्या मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. दुसरीकडे, सियाचे काही जुने व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्समध्ये यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
पुणे पोलिसांची फॉरेन्सिक टीम जप्त केलेले मोबाईल, डिलीट केलेला डेटा आणि इतर इलेक्ट्रॉनिक नोंदींचे विश्लेषण करत आहे. डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या तांत्रिक तपासणीतून केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील खरे रहस्य लवकरच उघड होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.






