माळेगाव : तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड करण्यासाठी बोलावलेल्या ग्रामसभेत एकास जिवे मारण्याची धमकी देऊन दगड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना नीरावागज (ता. बारामती) येथे घडली.
याबाबत संग्रामसिंह विश्वासराव देवकाते, रोहित विश्वासराव देवकाते, तुपार मुरलीधर देवकाते, अजित सुरेश देवकाते, आकाश हरिभाऊ देवकाते, ओंकार भगवान शेळके, सुनील यशंवतराव देवकाते, संग्राम सूर्यकांत देवकाते व इतर दोन-तीन (सर्व रा. नीरावागज, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाबूराव कारंडे (रा. नीरावागज, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नीरावागज ग्रामपंचायत तंटामुक्त समिती सदस्य निवड करण्यासाठी विशेष ग्रामसभा चालू होती. त्यावेळी प्राथमिक शाळा बुरुंगलेवस्ती येथे अनधिकृत चालू असलेले वर्ग फिर्यादीमुळे बंद झाल्याचा राग मनात धरून संग्रामसिंह देवकाते याच्यासह वरील आरोपींनी बाबूराव कारंडे यांना दगडाने आणि लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घटनेचा तपास उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.