उरुळीकांचन : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला उरुळीकांचन (ता. हवेली) येथे अडविण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी बुधवारी तीन जुलै रोजी केला होता. त्यानंतर याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर ग्रामस्थांवर कारवाई केली असून उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे पोहचल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यातील नगारा बैलगाडा अडविण्याचा प्रयत्न केला होता. पालखी रोखल्याने सोहळ्याचे विश्वस्त आणि गावकरी यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती.
त्यानंतर यवत मुक्कामी ठिकाणी आरती झाल्यानंतर पालखी सोहळा विश्वस्तांनी निषेध सभा घेऊन वारकऱ्यांच्या वतीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या पालखी सोहळ्याला अडथळा निर्माण करणाऱ्या ग्रामस्थांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन, माजी सरपंच भाउसाहेब कांचन, अलंकार कांचन, संतोष उर्फ पप्पु कांचन, प्रताप कांचन, राजेंद्र कांचन यांच्यासह इतर 15 ते 20 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 126 (2) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर गुन्ह्यात जिल्हाधिकारी आदेशाचे भंग करणे आणि सार्वजनिक व्यवस्थेचा भंग करण्याचा कलमांचा समावेश आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अद्यापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.
याबाबत उरुळी कांचनचे सरपंच अमित बाबा कांचन म्हणाले की, उरुळी कांचन येथील मागील ५६ वर्षाची परंपरा लक्षात ठेऊन, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची दुपारची सेवा आमच्याकडून घडावी म्हणून आम्ही मागणी करीत होतो. मात्र, गुन्हा दाखल होणे म्हणजे हा आमच्यासह ग्रामस्थांवर अन्याय आहे. याबाबत आम्ही लवकरच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागणार आहोत. यामध्ये पालखी सोहळा प्रमुख असलेल्या मोरे घराण्यांच्या चुका आहेत. यापुढील काळात पालखी सोहळ्याचे सर्व नियोजन प्रशासनाकडे द्यावे, अशी मागणी करणार आहोत.