पुणे : आंबेगावमध्ये राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीचा तिच्या आईने एका महिलेसोबत बोलणे करून बालविवाह केला. त्यानंतर पीडित मुलगी ही सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे पतीच्या घरी नांदण्यास गेली. त्या वेळी पतीने तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात करून बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्यामुळे सततच्या शिवीगाळ व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून मुलगी आईच्या घरी आली.
आईने पतीच्या घरी नांदण्यास जा, असे म्हणत तिला मारहाण व शिवीगाळ केल्याने तीन आरोपींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ वर्षीय मुलीची आई, जयश्री थोरात (वय ४०, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) व प्रशांत सुखदेव भालेराव ऊर्फ लोहार (वय ३०, रा. मंगळवेढा, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना मे २०२२ ते ३१ जुलै २०२४ यादरम्यान घडली आहे.