ओझर : जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर येथील स्वामी समर्थ मंदिरात आरतीच्या वेळी लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत मंदिराचे पुजारी अरुण सखाराम कुलवडे (वय ५५) व त्यांच्या आई शालन कुलवडे (वय ८५) यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करुन ओतूर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. ओतूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दाखल गुन्ह्यात फिर्यादी अरुण कुलवडे यांच्या फिर्यादीनुसार ओझरचे पोलीस पाटील प्रीती कवडे, सुनील कवडे व यश कवडे (सर्व रा. ओझर नं. १) यांच्यावर राहत्या घरात घुसून लाऊडस्पीकर वरील आवाज कमी कर या कारणावरून फिर्यादी कुलवडे व त्यांच्या आई शालन कुलवडे यांना मारहाण केल्याचे नमूद आहे.
तसेच दुसरे फिर्यादी सुनील कवडे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या घराच्या बाहेरील गेटवरून हातात तलवार, दगड, काठ्या आणून त्यांच्यावर हल्ला केला व चीजवस्तू फोडल्याने गणेश कवडे, गणेश कवडे, आशिष कवडे, विनोद घेगडे, विजय जोशी, जयेश जोशी, सुभाष उर्फ पप्पू दळवी, मल्हारी घेगडे, हेमंत कवडे, शिवाजी कवडे, शुभम कवडे, तेजस ढवळे, शुभम रवळे, राजेंद्र कवडे व इतर अनोळखी १० ते १५ इसम (सर्व राहणार ओझर नं. १) यांच्यावर गुन्हे दाखल केले.