लोणी काळभोर, (पुणे) : सोशल मिडियावर दाऊद इब्राहिमचे स्टेटस ठेवून दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी लोणी काळभोर येथील तीन तरुणांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उरुळी कांचन येथील तिघांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
अमिर इनामदार (रा. इनामदारवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), अरबाज मनियार (रा. पाषाणकरबाग, लोणी काळभोर, ता. हवेली), जुबेर तांबोळी (रा. प्राचिन शिवालयाजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कमलेश दत्तात्रय काळभोर (वय 40, धंदा व्यवसाय, रा. पांढरीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 20) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कमलेश काळभोर हे सोशल मिडीया पाहत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर दाऊद इब्राहिम व बिष्णोई यांचे फोटो स्टेटसला लावून त्या फोटोवर ‘जिसको तुम मुल्ले बोल रहे, वो मुल्ले तेरी पूरी खानदान खायेगा’. ‘बिष्णोई की कुछ छटी औलादे बोल रहे थे की, मुसलमान डर गये हमारे साम्राज्य से’ अशा आशयाचे स्टेटस ठेवल्याचे पाहिले. त्यानंतर काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती यांमध्ये (जनमानसात) एकोपा टिकण्यास बाधक व सार्वजनिक शांतता बिघडवण्यास संभवनीय अशी कृती केली असल्याबाबत कमलेश काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना भाजप शहराध्यक्ष कमलेश काळभोर म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीमध्ये दाऊद इब्राहिम, औरंगजेब, टिपू सुलतान यांचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. लोणी काळभोरमध्ये परंपरेने चालत आलेला हिंदू-मुस्लिम सलोखा राखून ठेवण्याची जबाबदारी दोन्ही गटांची आहे. अशी काही मुलं धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट करत असतील, तर त्यांना समजावणे हे त्या समाजातील जेष्ठांचे कर्तव्य आहे.”
सोशल मिडीयावर आक्षेपार्ह, सार्वजनिक शांतता भंग करणारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट कोणीही प्रसारित करू नये. तसेच सोशल मिडीयावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून प्रसारित करण्याचे दिसून आल्यास तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलिसांनी केले आहे.
उरुळी कांचनमध्ये देखील तरुणांनी ठेवले स्टेटस..
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतही तिघांनी स्टेट्स ठेवल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यातील दोघे अल्पवयीन असून तिघांनाही उरुळी कांचन पोलिसांकडून कायदेशीर नोटीस देण्यात आल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.