लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लोणी काळभोर शाखेने लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरातील एका पोल्ट्रीवर छापा टाकून सुमारे तीन लाखांची वीजचोरी उघडकीस आणली. याप्रकरणी एका बड्या पोल्ट्री चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी रामप्रसाद सुखदेव नरवडे (वय ३३, रा, मांजरी ग्रीन वूड वसाहत, शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, विजय बाळासाहेब काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामप्रसाद नरवडे हे महावितरणाच्या लोणी काळभोर शाखेत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. लोणी काळभोर शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील ग्राहकांकडून वीज बिल थकबाकी वसुली करणे, वीजचोरी शोधणे, पी. डी. ग्राहकांकडून थकबाकी वसुली करण्याचे असे आदेश महावितरणाच्या उरुळी कांचन उपविभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिले आहेत.
महावितरणचे सुमारे तीन लाखांचे नुकसान
लोणी काळभोर शाखेचे सहाय्यक अभियंता व कर्मचारी सीताराम चौधरी हे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरातील वीज बिल वसूली करत होते. तेव्हा विजय काळभोर यांनी त्यांच्या पोल्ट्रीसाठी वीज चोरी करून वापरत असल्याचे दिसून आले. विजय काळभोर यांनी महावितरणची ११ हजार ४८० रुपये इतकी थकबाकी असलेल्या ठिकाणी अनधिकृतपणे विजेचा चोरून वापर केला. त्यामुळे महावितरणचे सुमारे २ लाख ९६ हजार ६२९ रुपयांचे नुकसान झाले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी रामप्रसाद नरवडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करत आहेत.