पुणे: पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेच्या शाखेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत बँक सुरु ठेवल्याप्रकरणी २०२४ च्या आदेशानुसार आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या बँकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
त्यानंतर निवडणूक भरारी पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री पीडीसीसी बँकेत ४० ते ५० लोक रात्री संशयितरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वेल्हे येथील शाखेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आमदार रोहित पवार यांनीही वेल्हा पीडीसीसी बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानुसार निवडणूक भरारी पथकाने खातरजमा करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बँकेवर गुन्हा दाखल केला आहे.