पुणे: पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेचे उल्लंघन केल्याने ‘पब’वर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी पब मालक आणि व्यवस्थापकाने हुज्जत घातल्याचा प्रकार सोमवारी (दि. २९) रात्री कल्याणीनगरमधील बॉलर पबमध्ये घडला. याप्रकरणी बॉलर पबच्या मालकासह व्यवस्थापकांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बॉलर पबचा मालक हेरंब शेळके (वय ४०) याच्यासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस ठाण्यातील रात्र गस्तीवरील अधिकारी महेश लामखेडे सोमवारी तपासणीसाठी गेले होते. मध्यरात्री दोननंतर कल्याणीनगर भागातील बॉलर पब सुरू असल्याचे आढळले. पोलिसांचे पथक तेथे कारवाईसाठी गेले. पबमध्ये युवक-युवती होती.
वेळ संपल्यानंतर पबमध्ये गर्दी होती. ग्राहकांना खाद्यपदार्थ, तसेच मद्यपान अशा सेवा पुरविण्यात येत होत्या. त्यामुळे लामखेडे यांनी पब बंद करण्यास सांगितले. त्यावेळी पबंधील व्यवस्थापकाने पोलिसांशी वाद घातला. ‘तुम्ही आम्हाला त्रास दिल्यास आम्ही पोलीस आयुक्तांना दूरध्वनी करून तुमची तक्रार करू’, असे सांगितले. पोलिसांशी हुज्जत घालून, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.