इंदापूर : लाखेवाडी (ता. इंदापूर) गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांना १५ ते २० जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरोधात इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन रामचंद्र खाडे (वय ७१, रा. लाखेवाडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. प्रभाकर तुकाराम खाडे, संतोष प्रभाकर खाडे, शुक्रराज संतोष खाडे, धनराज प्रदीप खाडे (सर्व रा. लाखेवाडी, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी खाडे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. लाखेवाडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर चाललेली भांडणे मिटवली. त्याचा राग मनात धरून चार जणांपैकी संतोष खाडे याने त्यांना दगड फेकून मारला. इतरांनी लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केली. त्यामुळे त्यांना डोक्याला व तोंडाला मार लागला, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, आरोपी हे हर्षवर्धन पाटील गटाचे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायद्याचा भंग करत व घाबरवून लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. लाखेवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बबन खाडे यांनी अशा प्रकारच्या घटनांविरोधात आवाज उठवल्याने त्यांना मारहाण झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.