शिक्रापूर : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील काही दुग्धव्यावसायिकांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बँकेला बनावट कागदपत्रे सादर करून सव्वा कोटी रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत दिगंबर संदीपान फुले (वय ३० रा. गंगाकुज सोसायटी कळसगाव, पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बँकेशी संबंधित प्रीतम घोलप, शत्रुंजय साटणकर, अजिंक्य रसाळ, सागर लोढा, उत्तम तुकाराम नांदरे, सुनिता उत्तन नांदरे, राहुल दत्तात्रय शिंदे, दत्तोबा विष्णू शिंदे, प्रकाश मोहन धारकर, अक्षय प्रकाश धारकर, रवींद्र तात्याबा शिंदे, कल्पना रवींद्र शिंदे, प्रशांत अनिल गरुड़, योगिता प्रशांत गरुड, गौरव बाळासाहेब नंदखिळे, बाळासाहेब रामचंद्र नंदखिळे, प्रतिभा संतोष कौंडे, संतोष बाळासाहेब कौंडे, ऋषिकेश बाबुराव शिंदे, सपना ऋषिकेश शिंदे, अक्षय अशोक गरुड, शोभा अशोक गरुड, शिवाजी ज्ञानदेव कौंडे, मंगल शिवाजी कौंडे (सर्व रा. गणेगाव दुमाला ता. शिरुर जि. पुणे), अजित जालिंदर गवळी व अश्विनी अजित गवळी (दोघे रा. बाभूळगाव ता. शिरुर जि. पुणे), आदेश साळुंखे (रा. इनामगाव ता. शिरुर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, उत्तम नांदरे यांसह आदींनी २०२२ मध्ये फेड बँकेच्या मार्फत तब्बल एक कोटी २७ लाख ७१ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, सदर कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या विविध एजन्सीच्या माध्यमातून सदर कर्जदारांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी कर्जदार व सहकर्जदार यांनी बनावट कागदपत्रे बँकेला देऊन तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या कागदपत्रांची तसेच मालमत्तेबाबत कोणतीही चौकशी न करता बँकेचे अधिकारी व कर्जदार आणि सहकर्जदार यांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.