पिंपरी : प्रेम प्रकरणातून आपल्या घरातील मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून तिच्या नातेवाईकांनी संशयित मुलाच्या वडिलांचे अपहरण केले. ही घटना बुधवारी (दि. ९) सकाळी ११ वाजताच्या सुमारास मारुंजी येथे घडली. दिनेश रामनाथ चव्हाण (वय २५, रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय राठोड, अंकुश राठोड, संदीप राठोड, उमेश राठोड व त्यांचे सात साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मारुंजीतील अक्षय निवास, सरकार चौक येथे आरोपी एका गाडीतून आले, त्यांनी आमच्या मुलीला तुझा भाऊ नीलेश याने पळून नेले आहे. त्यांना आणून दे आणि तुझ्या वडिलांना घेऊन जा, असे म्हणत फिर्यादी व त्यांचे वडील रामनाथ यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली, तर तुम्हाला जिवे मारून टाकेल, अशी धमकी दिली. फिर्यादीचे वडील रामनाथ (वय ५५) यांना जबरदस्तीने अपहरण करून नेले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.