सासवड, (पुणे) : पुरंदर तालुक्यातील कोडीत (बु) गावातील मलाईवस्ती शिवारात ‘अफू’ या अमली पदार्थाची शेती करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दशरथ सिताराम बडधे (वय 65), तान्हाजी निवृत्ती बडधे (वय 69, रा. दोघेही कोडीत (बु) ता. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 21 हजार रुपयांची साडे दहा किलो वजनाची बोंडे जप्त करण्यात आली, अशी माहिती स्थानिक गुन्हे ग्रामीण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, कोडीत (बु) गावातील मलाईवस्ती शिवारात दशरथ बडधे व तान्हाजी बडधे यांनी त्यांचे शेतात शेवंती फुलाच्या शेतात विनापरवाना बेकायदेशीरपणे अफूची लागवड करून उत्पादन घेतले. याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार सासवड (Saswad News) व राजगड पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता शेतामध्ये दशरथ बडधे व तानाजी बडधे यांना ताब्यात घेतले.
अफूच्या ओल्या झाडांचे व बोंडांचे एकूण वजन 10 किलो 500 ग्रॅम किंमत अंदाजे 21 हजार रुपयांची रोपे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी दोघांवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, दगडू विरकर, सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुरज नांगरे, जब्बार सय्यद, प्रतिक धिवार, करंडे, भुजबळ यांनी केली.
अफू दिसू नये म्हणून शेतात कांदा, शेवंती फुलांची लागवड
अफूची लागवड केलेली दिसून येऊ नये यासाठी शेतात कांदा व शेवंती फुलांची लागवड करण्यात आली होती. पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अमली पदार्थाच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकले हे करत असून, गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे.