हडपसर, (पुणे) : युवतीच्या इच्छेविरोधात गर्भपात केल्याप्रकरणी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉक्टर दाम्पत्यांसह ९ जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. ०७) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च २०२२ ते आजपर्यंत पीडित मुलीच्या राहत्या घरात घडला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी निरंजन बाजीराव घुले, मुलाचे वडील बाजीराव घुले, मुलाची आई, मुलाचे दाजी मल्हार कुंजीर, मित्र समीर चौधरी, डॉ. टी. वाय. मोटे व डॉ. राजश्री मोटे (रा. दोघेही उरुळी कांचन, ता. हवेली) व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरंजन घुले व तरुणीची इन्स्टाग्रामवर मार्च २०२२ मध्ये ओळख झाली होती. आरोपीने तरुणीसोबत मैत्री करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीच्या घरी जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच फिर्यादी तरुणीचे लपून न्यूड व्हिडिओ व फोटो काढले. फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीच्या आई-वडिलांनी गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला.
दरम्यान, एवढ्यावरच न थांबता, गर्भपात न केल्यास तुला उजनी धरणात फेकून मारुन टाकू अशी धमकी दिली. यासाठी आरोपींनी मुलीला जबरदस्तीने उरुळी कांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये नेले. त्याठिकाणी आरोपी डॉक्टरांनी तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.