भोसरी (पुणे): वारसदार म्हणून नोंद होण्यासाठी चुलत आजोबांचा मृत्यू झालेला असतानाही त्यांच्या अंगठ्याचा ठसा उमटवून बनावट वकीलपत्र तयार केल्याप्रकरणी महिला वकीलासह एक जणावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भोसरी येथील मंडल अधिकारी कार्यालयात घडली.
या प्रकरणी राजेंद्र नामदेव रासकर (वय ५५, रा. चहोली बुद्रुक) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वकील अशोक ज्ञानेश्वर रासकर (वय ६७) आणि महिला वकील ज्योती गायकवाड (रा. आळंदी रोड, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून मंडल अधिकारी कार्यालय, भोसरी येथे फिर्यादी यांचे चुलत आजोबा रामचंद्र हरी रासकर हे मयत आहेत हे माहीत असताना देखील आरोपी अशोक व महिला वकीलाने वकीलपत्रावर त्यांच्या अंगठ्याचा ठसा मारुन बनावट वकीलपत्र तयार केले. हे वकीलपत्र मंडल अधिकारी, भोसरी यांच्या कार्यालयात जमा करून वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वारसदार म्हणून नोंद करीत फिर्यादी यांची फसवणूक केली.
फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथे फिर्यादींची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर शेत जमिनीमधील गट क्रमांक 158 आणि असलेली मिळकत ही त्यांची वडिलोपार्जित आहे. फिर्यादींचे वडील व त्यांचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर किसन रासकर आणि बहिण वत्सल्याबाई ज्ञानोबा माटे यांचे नावावर सदर मिळकत आहे. सन 2017 मध्ये राजेंद्र रासकर यांच्या वस्तीवर राहणाऱ्या गिताबाई गुलाब बुरडे यांची मुले सुरेश गुलाब बुर्डे, सुदाम गुलाब बुर्डे आणि संजय गुलाब बुर्डे यांनी रासकर यांच्या मिळकतमध्ये त्यांची वारस म्हणुन नोंद लावावी, यासाठी त्यांनी मंडल अधिकारी भोसरी पुणे येथे अर्ज दिलेला होता. परंतु, सदरचा अर्ज हा त्यावेळी फेटाळला. त्यानंतर त्यांनी प्रांत अधिकारी पुणे यांच्याकडे सदरचा अर्ज केला. तो अर्ज देखील फेटाळल्याने असल्याने त्यांनी. अतिरीक्त जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सदरचा अर्ज दिला.
त्यानंतर अतिरीक्त जिल्हाधिकारी यांनी 07/06/2021 रोजी आपील क्रमांक 86/2018 प्रमाणे भोसरी मंडल अधिकारी यांना सदर वारसांच्या मुद्याबाबत चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार सदरचे प्रकरण हे भोसरी मंडल अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यानुसार भोसरी मंडल अधिकारी यांनी चौकशी सुरु केली. सदर सुरु केलेल्या चौकशीस आपील क्रमांक 84/2022 असा क्रमांक देण्यात आलेला होता. सदर प्रकरणाच्या चौकशीमध्ये फिर्यादी देखील सदस्य होते. परंतु, सदर चौकशीच्या सुनावणीची प्रत ही त्यांना कधीही देण्यात आली नाही. त्यानंतर 17/08/2022 रोजी भोसरी येथील मंडल अधिकारी यांनी अंतिम आदेश दिला. त्यावेळी फिर्यादींना सदर वारसाबाबत मंडल यांनी अंतिम आदेश दिल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी तात्काळ चौकशीच्या नोंदीची प्रत मागवण्याचा अर्ज केला आणि चौकशीला स्थगिती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी हवेली यांच्याकडे अपील केले.
त्यावेळी फिर्यादींचा चुलत भाऊ अशोक ज्ञानेश्वर रासकर (वय 67 वर्षे) सदर यांनी वरील नमुद इसमांना हाताशी धरुन सदरचा वारसदार नोंदणीबाबत अर्ज केलेला असल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी राजेंद्र रासकर यांनी मंडल अधिकारी भोसरी यांच्या समोर आपील क्रमांक 84/2022 च्या नोंदीची प्रत वाचली, तेव्हा असे आढळून आले की, चौकशीच्या नोटीसा फिर्यादींना जाणूनबुजून बजावण्यात आल्या नाहीत. वरील इसमांनी वकीलपत्र दाखल केले होते. त्यामध्ये अशोक ज्ञानेश्वर रासकर यांचे नाव होते. तसेच त्याची व त्याच्या एकुण 10 नातेवाईकांच्या सह्या होत्या. तसेच त्यावर रामचंद्र हरी रासकर यांचा अंगठा देखील होता. परंतु, रामचंद्र रासकर यांचे निधन हे 16/04/1974 रोजी झालेले आहे. ते मयत असताना देखील वकीलपत्रावर अंगठ्याचा ठसा असल्याचे दिसुन आले. तसेच वकीलपत्रावर अशोक ज्ञानेश्वर रासकर याचे व्यतीरीक्त कोणाच्याही नावाचा उल्लेख नसल्याचे व पक्षकारांच्या सहीच्या ठिकाणी सर्व पक्षकारांच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसे दिसुन आले. सदरच्या सह्या व अंगठ्याचे ठसे हे अशोक ज्ञानेश्वर रासकर याने केलेले आहेत.
तसेच अशोक रासकर याने प्रतिवादी क्रमांक 2 ते 8, 11 आणि 12 यांच्यावतीने अर्जदाराच्या अर्जावर पाच ऑगस्ट 2022 रोजी रामचंद्र हरी रासकर यांचे निधन झालेले आहे, हे माहित असताना देखील म्हणणे दाखल केले. अशोक रासकर यांचे वकील नामे ज्योती गायकवाड रा. क्षितीज सोसायटी, दुर्गामाता कॉलनी. आळंदी रोड, भोसरी, पुणे हे पण खोटी सही करण्यासाठी तितक्याच जबाबदार आहेत, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.