बारामती, ता. 31 : बारामती शहरात मागील तीन दिवसांपासून काळ्या काचा, नंबर प्लेटशिवाय आणि भरधाव वेगाने एक चारचाकी गाडी संशयितरीत्या फिरत होती. मात्र पोलिसांनी अखेर तीन दिवसांच्या पाठलागानंतर ‘ती’ चारचाकी गाडी पकडली आहे. पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेऊन संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई केली आहे. अशी माहिती बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

कृष्णा अभिजीत क्षीरसागर (रा. माऊली नगर प्रगती, नगर रोड बारामती) असे गाडी चालविणाऱ्या गाडी चालकाचे नाव आहे. तर पोलिसांनी पकडण्यात आलेल्या गाडीचा वाहन क्रमांक MH 06 AZ 8555 हा आहे.

पुढे बोलताना चंद्रशेखर यादव म्हणाले की, बारामती शहरात काळ्या काचा असलेले अनेक वाहने बिनधास्तपणे फिरत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने बारामती वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी भिगवण चौकात काळ्या काचा असलेल्या वाहनांवर 24 मे रोजी कारवाई करत होते. तेव्हा पोलिसांना एका काळ्या काचा असलेली व नंबर प्लेट नसलेली एक चारचाकी गाडी भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने गाडी न थांबविता भरधाव वेगाने निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी सिटी इन चौकात गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाहनाचालक पुन्हा भरधाव वेगाने पुढे निघून गेला.

वाहतूक पोलीस सीमा घुले आणि रूपाली जमदाडे हे गांधी चौकात बुधवारी (ता.28) कर्त्यव्य बजावीत होते. तेव्हा त्यांना पुन्हा ती गाडी आढळून आली. मात्र वाहनचालकाने तेव्हाही गाडी थांबविली नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. नागरिकांची विचारपूस करून संबंधित वाहनाविषयी सविस्तर माहिती मिळवली. अखेर बारामती शहरातच ती चारचाकी शोधून काढण्यात आली आणि पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली.
दरम्यान, सदर वाहनावर काळ्या काचा, नंबर प्लेट नव्हती, विमा नव्हता तसेच पोलीस मॅन्युअलनुसार कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नव्हती. यामुळे वाहनचालकावर 3500 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, बेदरकारपणे वाहन चालवणे या प्रकरणी कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. सदर गाडीच्या काळ्या काचा कमी करण्यात आल्या असून खूप मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम सुद्धा काढण्यात आलेली आहे. सध्या सदरची गाडी बारामती वाहतूक शाखा या ठिकाणी डिटेन करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे, प्रज्योत चव्हाण, स्वाती काजळे, सीमा घुले, सुधाकर जाधव व अजिंक्य कदम यांच्या पथकाने केली आहे.







