संदीप टुले
केडगाव : दौंडच्या पूर्व भागातील वनक्षेत्रातील वनजमिनीतून बेकायदा वृक्षतोड, कोळसा खाणी आणि बेकायदा माती उत्खनन प्रकरणी पुणे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दौंडचे वनपाल रवींद्र धनाजी मगर व वनरक्षक किरण कदम यांच्यावर मागील दोन दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वन विभागाच्या तीन प्रमुख आणि मोठ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली या वृत्ताला पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी दुजोरा दिला आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये भीमा नदीच्या पट्ट्यात बेकायदा वृक्षतोड सुरू होती. तर राजेगाव, वाटलूज, नायगाव या भागात दहा ते पंधरा बेकायदा कोळसा भट्ट्या सुरू होत्या. याबाबत मलठण ग्रामस्थांनी दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे कारवाईची लेखी मागणी केली होती. परंतु दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यासह या भागातील वनपाल व वनरक्षक यांनी या प्रकरणाची कोणतीच दखल घेतली नव्हती व याबाबत कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे संबंधित बेकायदा वृक्षतोड करणारे तसेच संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वनपाल, वनरक्षक व तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी या वेळी ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे केली होती.
दरम्यान, पवार यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी शुक्रवारी (ता. ९) दौंड वनपरिक्षेत्रातील दौंड परिमंडळातील राजेगाव नियतक्षेत्रातील राजेगाव, मलठण, नायगाव, वाटलूज या गावांतील राखीव वनक्षेत्रात अवैध वृक्षतोडी आणि माती उत्खनन झाले आहे.
वनपाल रवींद्र मगर व वनरक्षक किरण कदम यांचे त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामावर तसेच वनसंरक्षणावर नियंत्रण नाही. या प्रकरणी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. तपासामध्ये अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे. यासाठी दौंड वनपाल रवींद्र मगर व वनरक्षक किरण कदम यांना निलंबन करण्याची कारवाई केली होती. आता बेकायदा वृक्षतोड आणि कोळसा भट्ट्या प्रकरणी दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी ही निलंबनाची कारवाई केली असून, तसा आदेश देण्यात आला आहे.