लोणी काळभोर : नागरिकांची सुरक्षा राखणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे, हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी लागणारे पुरावे गोळा करणे, न्यायालयाच्या माध्यमातून पीडितांना न्याय देण्यास मदत करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र, थेऊर (ता. हवेली) येथील दुर्घटनेत माझ्या मुलाचा अपघाती मृत्यू नसून, तो एक रचलेला घातपात आहे. तसेच या गुन्ह्यात लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी मदत केल्याचा आरोप बिबिन हाजी सय्यद यांनी व्यक्त केला आहे.
थेऊर येथे झालेल्या अपघातात अख्तर बिबन सय्यद (वय-२४) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर याप्रकरणी सागर महादेव धारवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेऊर (ता. हवेली) येथील महातारी आई मंदिराच्याजवळ १२ एप्रिल २०२४ रोजी हा अपघात झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तर सय्यद व सागर धारवाड हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे होते. १२ एप्रिलला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सागर धारवाड याने त्याचा मित्र करण भालसिंग याच्याकडून चारचाकी गाडी आणली होती. ही गाडी सागर चालवीत होता, तर त्याच्या बाजूच्या सीटवर अख्तर बसला होता. सागर धारवाड याने भरधाव वेगाने कार चालवली. त्यामुळे सागरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्त्याच्या शेजारी असलेल्या झाडाला धडकून पलटी झाली. या अपघातात अख्तर सय्यद हा गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यानंतर जखमी अख्तर सय्यदला उपचारासाठी तातडीने लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
याबाबत बोलताना अख्तरचे वडील बिबिन सय्यद म्हणाले की, अख्तरचा अपघात नसून तो एक नियोजनबद्ध केलेला घातपात आहे. गुन्ह्यातून सुटका मिळविण्यासाठी आरोपींनी रचलेला हा कट आहे. सागर धारवाड याने अख्तरला निर्जनस्थळी घेऊन जात घातपात केल्याचा आम्हाला पहिल्यापासूनच संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी लोणी पोलिसांकडे केली होती. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकांत खोसे यांनी या गुन्ह्याचा तपास करताना आरोपींना मदत कशी होईल? या पद्धतीने तपास केला. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून तपास काढून पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांच्याकडे देण्यात आला. त्यांनीही खोसेंच्या पाऊलावर पाऊल ठेवून आरोपींना सहकार्य केले.
वारंवार तपासामध्ये हलगर्जीपणा होत असल्याने बिबिन सय्यद यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याकडे तक्रार केली व सत्य परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घेतला. त्यावेळी तपासात काही त्रुटी आढळून आल्या. शशिकांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक खोसे व उपनिरीक्षक घोडके यांचा कसुर अहवाल देखील तयार केला आहे. परंतु, एवढं सगळं करूनही पोलिसांनी आजपर्यंत आरोपींना अटक केली नाही, असा आरोप बिबिन सय्यद यांनी केला आहे.
;
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, सर्वात प्रथम या प्रकरणाची तपासी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो. त्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अख्तरच्या वडिलांना न्याय मिळणार?
मागील ४ महिन्यांपूर्वी झालेल्या गुन्ह्यात लोणी काळभोर पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे पोलीस आरोपीला मदत तर करीत नाही ना? असा प्रश्न तयार होत आहे. अख्तरचे वडील बिबिन सय्यद यांना पोलीस ठाण्याच्या वारंवार चकरा का माराव्या लागतात? तसेच आरोपींकडून गुन्हा माघारी घ्या म्हणून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. आरोपी अजून किती दिवस मोकाट फिरणार? पोलीस अजून किती दिवस आरोपींना मदत करणार? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अख्तरच्या वडिलांना न्याय मिळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.