उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात गुरुवारी (ता. 03) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमरास झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच दाणादाण उडविली. या पावसामुळे काढलेला व काढणीस आलेला कांदा पिकाला मोठा फटका बसला. साठवलेले कांदे भिजल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तर अनेक भागात झालेल्या पावसाने उभ्या पिकात पाणी साचले होते.
अवकाळी पावसाचा काढणीला आलेल्या कांद्याला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. उन्हाळी कांद्याचा हंगामा असून हा कांदा शेतात तयार आहे, परंतु अवेळी येणाऱ्या अवकाळी पावसामुळे कांद्याची पात खराब होण्याची दाट शक्यता आहे. तसेच हे पावसाचे पाणी कांद्याच्या पातीमध्ये गेल्यास कांदा साठवण योग्य राहणार नसून तो लवकर खराब होऊ शकतो तसेच पावसाच्या पाण्यामुळे कांद्याला काजळी लागण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे सध्या कांद्याला भावही नाही. त्यातच अवकाळी पावसाचाही उन्हाळी कांद्याला फटका बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच कांद्याला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचा खर्चही झाला आहे. कांदा पीक शेतकऱ्याला मजुरी व शेतीची मशागत त्याचप्रमाणे लागणारे रासायनिक खते यामुळे कांदा पीक हे परवडत नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवेली तालुक्यातील शिंदवणे, वळती, व दौंड तालुक्यातील डाळिंब आदी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो. एकंदरीतच काढणीला आलेला कांदा तसेच कांद्याला कमी होत असलेले बाजारभाव या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
दरम्यान, एप्रिल महिना हा कांदा काढणीचा हंगाम असतो. मात्र या पावसामुळे काढणीस आलेल्या कांद्याचे सर्वांत मोठे नुकसान झाले. वादळामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसाचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला. वादळामुळे टमाटे, मिरची व अन्य भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे ठिकठिकाणी आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे सांगीतले.
याबाबत बोलताना शिंदवणे येथील प्रगतशील शेतकरी सचिन विठ्ठल महाडिक म्हणाले, “हवेली तालुक्यातील शिंदवणे गावामध्ये अवकाळी पावसाने कांदा भाजीपाला यांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. एक एकर कांदा काढणीला आला असून या अवेळी येणाऱ्या पावसामुळे कांदा पिकाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यातच कमी झालेले बाजारभाव या दुहेरी संकटांमुळे शेती पिकवायची तरी कशी असा प्रश्न आता पडला आहे.