पुणे : इंद्रायणी तांदळाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्याच्या भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गाव खेड्यांमध्ये पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक पद्धतीने शेतीची कामे करण्यात येत आहेत. मशागतीच्या कामांना गती येत असतानाच मागील आठवडाभर दिवसा ऊन तर सायंकाळी पाऊस पडत आहे. या भागामध्ये धूळवाफ पद्धतीने भात पेरणी केली जाते.
सर्व तालुक्यांमध्ये तांदळाच्या विविध जातींचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यांतील इंद्रायणी तांदळाला राज्यासह देशातून मागणी आहे. तसेच, परदेशातूनही चांगली मागणी असते. तांदळाशिवाय नाचणी, वरई यांचे देखील उत्पादन तालुक्यातील दुर्गम भागात घेतले जाते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी पावसाचे एक आठवडा अगोदरच आगमन होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील वर्षी तांदूळ उत्पादनातून चांगला आर्थिक लाभ मिळणार असल्याच्या आशेवर शेतकरी कामाला लागला आहे. सध्या शेतकरी शेत भाजवणी करण्याच्या कामांमध्ये व्यस्त दिसत आहेत.