लोणी काळभोर, (पुणे) : ‘ए टू झेड एक्सझीन’ कंपनीचा केमिकल युक्त राख फुरसुंगी (ता. हवेली) रेल्वे मालधक्क्यात न आणण्यासाठी लोणी काळभोर येथील शेतकरी मागील चार दिवसांपासून आंदोलन करत होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अखेर आज गुरुवारी (ता. १९) यश आले असून कंपनी सदर माल हा परत घेऊन जाणार आहे.
लोणी काळभोर येथील शेतकऱ्यांनी ‘ए टू झेड एक्सझीन’ कंपनीचा केमिकल युक्त राख फुरसुंगी रेल्वे मालधक्क्यात न आणण्यासाठी रेल्वे स्टेशन मास्तर शाम कृष्णा यांना निवेदन दिले.
यावेळी लोणी काळभोरचे ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, माजी उपसरपंच इंद्रभुज काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, गजानन काळभोर, चीफ कमर्शल इन्स्पेक्टर माधव अन्नदाता, गुड्स सुपरवायझर हेमंत मोरे, विकी नरके, पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र पटेल, संतोष काळभोर, अप्पासाहेब काळभोर, सागर काळभोर, संतोष काळभोर, आशिष काळभोर, सचिन काळभोर, सुरेश काळभोर, सचिन इंदलकर, दिलीप काळभोर, काळु कोळपे, मानिक महानवर, राहुल काळभोर, आबा लकडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील सहा महिन्यांपासून कंपनीची रॅक तशीच उघड्यावर पडून आहे. या राखेमुळे शेती, पिके, मानवी डोळ्यांचे व घशाचे विकार होत आहे. तसेच या राखेच्या वाहतुकीदरम्यान ही राख इतरत्र उडत सल्याने हवेत मोठ्याप्रमाणात प्रदूषण देखील होत आहे. राखेच्या धुळीने सर्वच परिसरात धूसर वातवरण निर्माण होत आहे, यामुळे अनेक छोट्या अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे या राखेच्या संदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेताना फुरसुंगी रेल्वे स्थानकावर आंदोलनाला सुरुवात केली.
दरम्यान, फुरसुंगी रेल्वे स्थानकाच्या शेजारील हजारो हेक्टर क्षेत्र हे बारामाही बागायती असुन ऊस व भाजीपाला हे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे, मात्र येथून उडणारी राख ही थेट पिकांवर जाऊन बसल्याने पिके धोक्यात येत आहेत. तसेच जमीन देखील नापिकीकडे जात आहे. यामुळेच आक्रमक शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसताना आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे कंपनीने देखील या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देताना केमिकल युक्त राख परत पाठविण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
कोणत्याच सुविधा पुरविल्या नाहीत…!!!
फुरसुंगी (ता. हवेली) रेल्वे स्टेशन येथील मालधक्का दोन वर्षापुर्वी सुरु करण्यात आला आहे. धक्का चालु करताना व चालु झाल्यानंतर सुरवातीला सदर धक्का चालकाने शेती व नागरिकांचे आरोग्याचे दृष्टीने योग्य त्या सुविधा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सदर धक्का चालकाने आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सुविधा केलेल्या नाहीत.