न्हावरे,ता.०४: शिरूरच्या पूर्व भागामध्ये स्वयंघोषित स्थानिक ऊस खरेदीदार व्यापाऱ्यांकडून कमी बाजार भावामध्ये ऊस खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे अशा ऊस खरेदीदार व्यापाऱ्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्यामुळे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून स्थानिक ऊस खरेदीदार व्यापाऱ्यांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले की, नाशिक येथील व परराज्यातील ऊस खरेदीदार व्यापारी हे रसवंतीसाठी प्रतिटन ३८०० रुपये ते ४१०० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करत आहेत. तशा प्रकारचे ऊस खरेदीचे अनेक व्यवहारही झालेले आहेत. मात्र,परिसरातील स्थानिक स्वयंघोषित ऊस खरेदीदार व्यापारी नाशिक व परराज्यातील व्यापाऱ्यांना दमबाजी करून प्रतिटन ३५०० रुपयांच्या पेक्षा कमी बाजार भावामध्ये ऊस खरेदी करण्यासाठी दबाव टाकत आहेत .त्यामुळे जास्त भावाने ऊस खरेदीचे झालेले अनेक व्यवहार मोडले आहेत. तसेच स्थानिक ऊस खरेदीदार व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. असा दावा करताना शेतकऱ्यांनी स्थानिक ऊस खरेदीदार व्यापाऱ्यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला.
दरम्यान न्हावरे येथे बुधवारी (ता.०२) स्थानिक ऊस खरेदीदार व्यापारी व परराज्यातील ऊस खरेदीदार व्यापारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये न्हावरे सोसायटीचे चेअरमन व ऊस उत्पादक शेतकरी अमोल गावडे,आंबळेचे माजी सरपंच, प्रगतशील शेतकरी संताजी बेंद्रे, न्हावरे येथील ऊस उत्पादक शेतकरी योगेश भोंडवे, राहुल गावडे, समीर बहिरट तसेच न्हावरे ,गुणाट, निर्वी, शिरसगाव, शिंदोडी, निमोणे, आंबळे, करडे, दहिवडी, आंधळगाव, नागरगाव, आलेगाव पागा, रांजणगाव सांडस येथील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्थानिक ऊस खरेदीदार व्यापारी व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आहे.
“स्वयंघोषित स्थानिक ऊस खरेदीदार व्यापाऱ्यांच्या संघटनेची पोलिसांनी चौकशी करावी.त्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शिरूर पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे.त्यांची संघटना बोगस असून,अशा संघटनेकडून ऊस उत्पादक शेतकरी व नाशिक आणि परप्रांतीय ऊस खरेदीदार व्यापाऱ्यांवर दबाव आणला जात आहे”.
अमोल गावडे(चेअरमन,न्हावरे विकास सोसायटी व ऊस उत्पादक शेतकरी)