पळसदेव : सध्या शेतकरी स्तरावर शेतीची ई -पीक पाहणी नोंद करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या सातबाराला ई पीक पाहणीची नोंद करण्याचे बाकी राहिले आहेत. अनेकवेळा पीक पाहणीची नोंद करताना सर्व्हरच्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना नोंद करता आली नाही. पळसदेव भागात सुमारे साठ ते सत्तर टक्के शेतकरी अद्याप पीक पाहणी नोंद करण्याचे बाकी आहेत.
पळसदेवसह तालुक्यातील इतरही गावात हीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्याला भविष्य काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पीक कर्ज काढणे, जमिनी खरेदी विक्री व्यवहार, विविध योजनांसाठी अर्ज करताना सातबाराला पीक पाहणीची नोंद असणे आवश्यक आहे. मात्र कृषि विभाग व महसूल विभागाने ई -पीक पाहणीबाबत आवश्यक प्रचार प्रसिद्धी न केल्याने अनेक शेतकरी पीक पाहणी करू शकले नाहीत.
तरी विविध कामांसाठी शेतकऱ्यांना ई -पिक पाहणीची अडचण होऊ नये यासाठी ई -पीक पाहणी करण्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पीक पाहणी करणेबाबत शासन स्तरावरून आणखी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी निरक्षर असल्याने स्वतः ई पीक पाहणी नोंद करू शकत नाही. त्यांच्यासाठी देखील शासनाने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
याबाबत कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्याचे संचालक भूषण काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अनेक शेतकरी अद्याप ई पीक पाहणी करायचे बाकी आहेत. मागे दुष्काळ निधीतही अनेक शेतकरी केवळ सातबाराला पीक पाहणी नाही म्हणून मदतीपासून वंचित राहिले होते. सध्यादेखील पीक कर्ज काढताना पिकपाहणीची नोंदणी असल्याशिवाय सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या यांचेकडून कर्ज मिळत नाहीत. सदरच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून शासनाने ई पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.