संदीप बोडके
लोणी काळभोर : पुर्व हवेलीत सुरू असलेल्या सामाईकातील अकरा गुंठेच्या फेरफार नोंदी अचानकपणे रद्द होऊ लागल्या आहेत. यासाठी तहसीलदार मंडल अधिकाऱ्याकडे, तर मंडल अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाकडे बोट दाखवत आहे. मात्र, यामुळे हजारो शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत नागरिकांनी आमदार अशोक पवार व पैलवान संदीप भोंडवे यांच्याकडे तक्रारी करत दाद मागितली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदीदस्त नोंदणीचा कायदा एकच असताना पुर्व हवेलीत, मात्र त्या कायद्यास बेकायदेशीर ठरवून प्रमाणभूत क्षेत्राच्या नोंदी थांबविण्यात आलेल्या आहेत. अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या म्हणण्यानुसार प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदीदस्ताच्या नोंदी बेकायदेशीर असतील, तर संपूर्ण जिल्ह्यात यापुर्वी झालेल्या व सध्या सुरु असलेल्या नोंदी रद्द करण्यात याव्यात. तसेच अशा प्रकारे बेकायदेशीर नोंदी करणारे तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे संदीप भोंडवे यांनी केली आहे.
खरेदी दस्ताच्या नोंदी सातबारा सदरी करत असताना, पुर्व हवेली तालुका वगळता संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्ती ग्राह्य न धरता प्रमाणभूत क्षेत्र ग्राह्य धरुन सातबारा सदरी नोंद घेतली जाते. परंतु, पुर्व हवेली तालुक्याच्या अपर तहसील कार्यालयाच्या भूमिकेमुळे प्रमाणभूत क्षेत्र ग्राह्य न धरता व्यक्ती ग्राह्य धरल्याने प्रमाणभूत क्षेत्राच्या सर्व नोंदी रद्द करण्यात येत आहेत. पुरंदर, दौंड, खेड व शिरुर तालुक्यासह इतर तालुक्यात प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदीदस्ताच्या नोंदी सातबारा सदरी होत असताना, पुर्व हवेलीत मात्र बेकायदेशीर नोंदीचे कारण देत त्या सातबारा सदरी रद्द होत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी २३ फेब्रुवारी २०२४ ला परीपत्रक काढत सामाईक खरेदी खताच्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या नोंदी अभिलेखात करू नये, अशा सूचना सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना केल्या होत्या. परंतु, त्यामध्ये प्रमाणभुत क्षेत्र किती जणांनी खरेदी करायला हवे, याबाबत कोणताच खुलासा केलेला नाही. बागायती क्षेत्रात १० गुंठे व जिरायतमध्ये २० गुंठे क्षेत्र एका व्यक्तीच्या नावावर खरेदीदस्त असेल तरच नोंद करावी, अशा तोंडी सुचना तहसीलदार कोलते यांनी सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे संदीप भोंडवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सातबारावरील फेरफार नोंदीच्या विसंगत नियमाबाबत जिल्हाधिकारी यांची लवकरच भेट घेणार आहे. तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पुर्व हवेलीतील फेरफार नोंदीबाबत पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे.
आमदार अशोक पवार (शिरूर-हवेली)अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात महसूली अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे साशंकता निर्माण झाली आहे. अपर तहसीलसह पुणे जिल्ह्यात प्रमाणभूत क्षेत्राच्या फेरफार नोंदीबाबत एकच नियम असावा. जर चुकीच्या नोंदी झाल्या असतील, तर त्या तात्काळ रद्द कराव्यात. चुकीच्या नोंदी ज्यांच्या कार्यकालात झालेल्या आहेत, त्या संबंधित तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री (नागरी विमान वाहतूक व सहकार) मुरलीधर मोहोळ व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पैलवान संदीप भोंडवे (अध्यक्ष-महाराष्ट्र क्रीडा प्रदेश आघाडी)