उरुळी कांचन, (पुणे) : वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मुळा-मुठा नदीकाठच्या पूर्व हवेलीतील हिंगणगाव, कोरेगावमूळ, शिंदेवाडी, अष्टापूर, टिळेकरवाडी परिसरातील शेतकरी हैराण झाले आहे. विजेअभावी शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने कडक उन्हामुळे शेतातील पिके सुकू लागली आहे. त्यामुळे योग्य दाबाने सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी हिंगणगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
दोन आठवड्यांपासून 40 वर पोहोचलेला पारा, उन्हाच्या दाहकतेने भेगाळणाऱ्या जमिनी, महावितरणचा आठ तास वीजपुरवठा मात्र त्यातही २ ते ३ तासाचे लोडशेडिंग यामुळे पुरेशी जमीन भिजत नसल्याने करपत चाललेली पिके ही भयाण वास्तवता सध्या शिवारात आहे. वाढत्या उन्हासह महावितरणच्या दुजाभावामुळे नदीकाठच्या गावांतील पिके, जनावरे व शेतकरी होरपळून निघत आहे. ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे पिके करपू लागली आहेत. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असून, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीजप्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली.
सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे तास-दीड तासाला वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके सुकू लागली आहे. विजेच्या लपंडावामुळे विहिरीवरील कृषीपंप बंद पडल्याने शेतातील तरकारी पिकाची लागवड खोळंबली आहे.
सतत भारनियमन, दुरुस्तीच्या कामामुळे वीजप्रवाह वारंवार खंडित
सतत भारनियमन, दुरुस्तीच्या कामामुळे वीजप्रवाह वारंवार खंडित होण्याचे प्रमाण आणि बाकी इतर कारणांमुळे कायमच वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे भारनियमनाच्या संकटाबरोबर इतर दुरुस्तीच्या संकटांशी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यावेळी संतप्त झालेल्या हिंगणगाव येथील शेतकऱ्यांनी उरुळी कांचन येथील थेट वीज वितरण कार्यालय गाठून आपली सर्व कैफियत मांडली.
यावेळी यशवंत सहकारी साखर कारखाण्याचे संचालक कुंडलिक थोरात, काळूराम थोरात, माऊली थोरात, हिंगणगावचे सरपंच सागर थोरात, उपसरपंच, अतुल गायकवाड, किसन थोरात, सुधीर घोळे, पोपट थोरात, नितेश धावडे,पोपट गडदे, देवीदास पोपळघट, राहुल थोरात, नानासाहेब कोतवाल, सचिन खेडेकर, अनिल थोरात, वैभव पिंगळे, भानुदास थोरात उपस्थित होते.
बिबट्याचे हल्ले सुरूच..
विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने टिळेकरवाडी, भवरापूर, टिळेकरवाडी, हिंगणगाव व उरुळी कांचन परिसरात बिबट्या वारंवार दिसून येत आहे. तसेच हिंगणगाव व टिळेकरवाडी येथील शेतकऱ्याच्या मेंढ्यावर बिबट्याने ताव मारला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत आहेत.
‘थ्री फेज’च्या वेळेतही सातत्याने वीजपुरवठा खंडित
“वीज कंपनीकडून नियोजित ‘थ्री फेज’च्या वेळेतही सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात आहे. सातत्याने रात्री खंडित होणारा वीजपुरवठा शेती व शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असून, परिसरात वारंवार होणारे बिबट्याचे हल्ले विचारात घेऊन वीज कंपनीने दिवसा वीजपुरवठा करावा.
– काळूराम थोरात, प्रगतशील शेतकरी, हिंगणगाव, ता. हवेली.
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील प्रभारी उपकार्यकारी अधिकारी प्रवीण महामुळकर म्हणाले, “शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यांना त्यांच्या सोयीनुसार वीजपुरवठा देण्यात आले आहे. तास-दीड तासाला वीज पुरवठा खंडित होत असेल तर तो वाढवून देण्याचे आश्वासनहि या शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.