उरुळी कांचन,(पुणे) : गाईंसाठी चारा घेऊन येतो असे म्हणून शेतात गेलेल्या एका 55 शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. 22) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली.
किसन मारुती खेडेकर (वय 55, रा. शिंदवणे ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा भाऊसाहेब किसन खेडेकर (वय 33, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी किसन खेडेकर हे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गाईंसाठी चारा घेऊन येतो असे म्हणून ते त्यांच्याकडे असलेली एक्टिवा मोटरसायकल घेऊन रानात गेले होते. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने फिर्यादी भाऊसाहेब खेडेकर व त्यांचा मुलगा दुचाकीवरून वडिलांना पाहण्यासाठी गेले.
यावेळी किसन खेडेकर यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ नागरिकांच्या मदतीने खाली उतरवले. त्यांना तात्काळ शिंदवणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
दरम्यान, किसन खेडेकर यांच्या मरणाबाबत कोणाविरुद्ध काही एक तक्रार नसल्याचे मुलगा भाऊसाहेब खेडेकर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जबाब दिला आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार सांगडे करीत आहेत.