आळेफाटा, (पुणे) : आपल्या घरातील पाळीव प्राण्यांप्रती अनेकजण भरभरून प्रेम करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात जुन्नर तालुक्यातील शिरोली बोरी येथील एका बैलाचा मृत्यू 3 सप्टेंबरला झाला होता. याच बैलाच्या मृत्यूनंतर त्याचा दशक्रिया विधीच आयोजित करण्यात आला होता. शिवनेर भूषण ह. भ. प. तुळशीराम महाराज सरकटे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर दशक्रिया विधी संपन्न झाला.
शिरोली बोरी येथील कै. गंगाराम कोंडाजी खिल्लारी यांच्या देवमन या बैलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि.12) या बैलाचा दशक्रिया विधी पार पडला. बैलाची आठवण कायम राहावी म्हणून घरासमोर हुबेहूब बैलाचा पुतळा उभा केला. त्यांच्या कुटुंबयांचे बैलाबद्दल असणारे प्रेम, जिव्हाळा हा अतूट होता. तसेच कुटुंबांनी दाखवलेल्या बैलाबद्दल प्रेमाची पंचक्रोशीत चर्चा आहे.
२१ वर्षांपासून घरात होता बैल..
देवमन हा बैल गेल्या २१ वर्षांपासून घरात असायचा. तो कुटुंबाचाच एक सदस्य म्हणून राहायचा. गाडामालक नामदेव खिल्लारी, देवराम खिल्लारी यांना नंदू डावखर यांनी देवमन हा २ वर्षांचा असताना नांदूर पठार गावचे शेतकरी शांताराम आहेर यांच्याकडून खरेदी करून दिला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे त्याचा तब्बल २१ वर्षे सांभाळ केला.
शर्यतीत नेहमी अव्वल..
देवमन बैलाची बैलगाडा स्पर्धेत पळण्याची पद्धत ही खूप आकर्षक होती. पायांमध्ये अंगार, अणि नजरेत तलवारीची धार होती. त्याने साकोरी, खडकी, पिंपळगाव, मंचर, घोडेगाव, चऱ्होली, थापलिंग, वडगाव अशा अनेक मोठी धावपट्टी असणाऱ्या घाटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.