पुणे : भारताने टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला. त्यानंतर सर्वत्र नागरिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी एका तोतया पोलिसांनी जल्लोष करणाऱ्या नागरिकांना धमकावल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तोतया पोलिसाला अटक केली आहे.
याबाबत पोलीस शिपाई राहुल सोनार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सुमंत किशोर पार्टे (वय-२२, सध्या रा. शोभा टाॅवर, पूना हाॅस्पिटलजवळ, नवी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांचे बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी मध्यरात्री भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, पुणे शहरातील अलका चित्रपटगृहाजवळ मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही तरुण जल्लोष करत होते. त्यावेळी खाकी रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या सुमंत पार्टे याने जल्लोष करणाऱ्या तरुणांना बंदुकसदृश वस्तूने मारहाण केली. दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांना धमकावून मारहाण केली. याबाबतची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पार्टेला तब्यत घेतले. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांचे बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.