शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील हॉटेल व्यवसायिकांना अन्न औषध प्रशासन अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या तोतया अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्याला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत मंगलाराम येना राम देवासी (सध्या रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. जिवंतकला ता. राणी जि. पाली राजस्थान) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी उगमाराम खानुराम (रा. स्पाईन रोड, चिंचवड पुणे) याला अटक केली आहे.
देवासी यांच्या न्यू चामुंडा स्वीट होम तसेच ठाकूर देवासी यांच्या चामुंडा स्वीट होम येथे आणि सोनेसांगवी रोड येथील अमित देवासी यांच्या जय भवानी स्वीट होम येथे एक इसम आला. त्याने प्रत्येक स्वीट होममधून काही पदार्थ पार्सल घेतले. त्यानंतर काही वेळाने तुमच्या पदार्थांमध्ये भेसळ आहे. मी स्वतः अन्न औषध प्रशासन अधिकारी असल्याचे सांगत सर्वांना त्यांच्यावर कारवाई करण्याची भिती दाखवली. दरम्यान स्वीट होम चालकांना बाजूला घेत सदर प्रकरण येथेच मिटवून घेऊ असे सांगून त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली.
यावेळी स्थानिकांना माहिती देत पोलिसांना बोलावून घेत सदर इसमाकडे चौकशी केली असता तो उडवाउडावीची उत्तरे दिली. त्यावेळी सदर इसम हा बनावट व तोतयागिरी करणारा बोगस अन्न व औषध प्रशासन अधिकारी असल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे हे करत आहेत