संदीप टूले
Pune Crime केडगाव : मुंबई एफडीए ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी करून, ‘आपल्या दुकानातून चुकीची गोळी गेली आहे. आपला बॅच नंबर मॅच होत आहे. हे प्रकरण आपसात मिटवायचे आहे का? असल्यास १५ ते २५ हजार रुपये द्या. पैसे पाठवले नाही, तर उद्या तुमचे मेडिकल स्टोअर्स सिल करण्यात येईल,’ अशी धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रयत्न दौंड तालुक्यातील केमिस्ट बाबत घडत आहेत. दरम्यान, याबाबत संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा केली असता, असा कोणत्याही प्रकारचा कॉल ऑफिसमधून जात नाही याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. यामुळे गैरप्रकार थांबवण्यासाठी सतर्क होऊन सायबर गुन्हे शाखेची मदत घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पूर्वीच्या काळी लॅण्डलाईन फोन होते. पुढे मोबाईल आला, अँड्रॉईड टेक्नॉलॉजी आली आणि मोबाईलचे जगच बदलून गेले. मोबाईलवर हजारो ॲप्सची निर्मिती झाली. आपल्याकडे सेव्ह नसलेला नंबर कोणाचा आहे, हे कळण्यासाठी शेकडो ॲप्स उपलब्ध झाले. मात्र, अशा ॲप्सचा गैरवापर वाढत असून, लोकांच्या पैश्यावर ऑनलाईन गंडा घालणारी प्रकरणे समोर येत आहेत. स्पुफिंगचा म्हणजेच एखाद्याला फोन करून मी अमूक मंत्र्याच्या, अधिकाऱ्याच्या किंवा सेलिब्रेटीच्या घरातून, ऑफिसमधून बोलतो असे सांगून खंडणी मागितली जात आहे.
दौंड तालुक्यातील केमिस्ट बंधवांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रयत्न दौंड तालुक्यातील केमिस्टबाबत घडत आहेत. दरम्यान, अशा प्रकारचे कॉल कोणत्याही एफडीएच्या ऑफिसमधून जात नाहीत तसेच या प्रकाराशी एफडीएचा काहीही संबंध नाही. केमिस्ट बांधवांनी सतर्क होऊन, असे पैसे मागणाऱ्यांवर खात्री करून पोलीस केस करावी.
– दिनेश खिवंसरा, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, पुणे
अशा प्रकारचा कोणताही कॉल आपल्या मोबाईलवर आला तर घाबरून जाऊ नका. पैसे पाठवू नका. पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांशी संपर्क साधा. संघटना तुम्हाला नक्की मदत करेल.
– रोहिदास राजपुरे, सदस्य, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन