दौंड : हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन गर्भवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमध्ये नुकताच उघडकीस आला. आरोपींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त झालेल्या विवाहितेच्या माहेरच्यांनी तब्बल तीन तास मृतदेह थेट दौंड पोलीस ठाण्यात ध्वजस्तंभाजवळ आणून ठेवला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मृतदेह पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपी पतीसह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पाचही आरोपी फरार आहेत. विवाहितेचा पती पुणे शहर पोलीस दलात अंमलदार असल्यानेच त्याच्याविरूद्ध स्थानिक पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप करत उपस्थितांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस अंमलदर रोहित ओहोळ याची पत्नी श्वेता रोहित ओहोळ (वय २३ , रा. रेल्वे हायस्कूल रस्ता, बंगला साइड, दौंड) हीने २० डिसेंबर रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींनीच तिची हत्या केल्याचा दावा करीत आक्रोश केला.
दरम्यान, श्वेता ओहोळ हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससून सर्वोपचार रूग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदनानंतर माहेरच्या मंडळींनी मृतदेह थेट दौंड पोलीस ठाण्यात आणला आणि ध्वजस्तंभाजवळ ठेवला. या अनपेक्षित घटनेमुळे तणाव निर्माण झाला. श्वेताचा पती रोहित ओहोळ हा पुणे पोलीस दलात असल्याने त्याच्याविरूद्ध स्थानिक पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप करत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
उप अधीक्षक स्वप्नील जाधव यांनी महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह पोलीस ठाण्यातून अंत्यविधीसाठी नेण्यात आला. या बाबत दौंड पोलीस ठाण्यात श्वेता ओहोळ हिची आई पद्मा गणेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती रोहित रवींद्र ओहोळ, दीर रोहन रवींद्र ओहोळ, नणंद रितू रवींद्र ओहोळ, सासू रमा रवींद्र ओहोळ व आतेसासू राणी वसंत जाधव (सर्व रा. रेल्वे हायस्कूल रस्ता, बंगला साइड, दौंड ) यांच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, गर्भाचा मृत्यू, हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता हिने दोन वर्षांपूर्वी रोहित याच्याबरोबर आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहानंतर श्वेताचा अशा प्रकारे दूर्दैवी अंत झाल्यामुळे परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.