पुणे : मांजरी येथील नव्याने बांधकाम झालेल्या इमारतींसाठी इलेक्ट्रिक डीपी उभारून विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागून २ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई
भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) असे या लाचखोर कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका विद्युत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. सावंत हा महावितरणच्या बंडगार्डन विभागात नेमणुकीस आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार हे शासन मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार आहेत. त्यांच्या ओळखीचे काही बांधकाम व्यावसायिक आहेत. या बांधकाम व्यावसायिकांनी पाच इमारती बांधल्या असून या इमारतींसाठी इलेक्ट्रिक डीपी उभारुन विद्युत प्रवाह सुरू करुन देण्याचे काम तक्रारदाराने घेतले होते. त्यासाठी त्यांनी पाच फाईल तयार करुन मंजुरीसाठी भाऊसाहेब सावंत यांच्याकडे दिल्या होत्या. तसेच, तक्रारदार यांनी मांजरी येथील एका नवीन इमारतीच्या ठिकाणी उभारलेल्या डीपीवर वीज भार आरोपी भाऊसाहेब सावंत याच्याकडून मंजूर करुन घेतला आहे.
दरम्यान, या ५ फाईल्स प्रलंबित होत्या. त्यावर कार्यवाही करण्यासाठी आणि मांजरी येथील नविन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सावंत याने पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार देण्यात आली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता सावंत याने पाच लाखांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये स्वीकारत असतानाच त्याला एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत.