शिरुर : मीना शाखा कालव्यावरील पाणी वापर संस्थांचे पाणी नियोजनाचे काम उत्कृष्ट पद्धतीने चालले असून भविष्यात पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी पाण्याचा योग्य वापर करावा. पाणी वाया न जाता पाणीपट्टी भरून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे. यामध्ये वडनेर (ता.शिरूर) येथील गुरुनाथ पाणी वापर संस्थेचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी केले.
मंगळवारी (दि.21) रोजी गुरुनाथ पाणी वापर संस्थेच्या वडनेर (ता.शिरूर ) येथील कार्यालयाचे उद्घाटन कडुसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संस्था अंतर्गत एकूण 535 हेक्टर क्षेत्र आहे. 491 सभासद असलेल्या या संस्थेची दर वर्षी एकरकमी शंभर टक्के पाणीपट्टी जमा केली जाते. यापूर्वी संस्थेस अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शेतकऱ्यांच्या वतीने घोड व कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन देत पाणी वापर संस्था अंतर्गत चाऱ्यांची दुरुस्ती, झाडे- झुडपे काढणे , तसेच वेळेत आवर्तन मिळण्यासाठी योग्य नियोजन केले जावे अशी मागणी केली .
यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी सुनिल दाते, तानाजी चिखले, सुभाष झिंजाड, उपसरपंच विक्रम निचित, गुरूनाथ संस्थेचे अध्यक्ष बाबाजी राऊत, सचिव रखमा निचित, तसेच विविध पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.