सासवड : सासवड (ता. पुरंदर) नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोहन वांडेकर यांच्यावर जेजुरी पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या जेजुरी येथील कार्यकर्त्या असलेल्या महिलेने याबाबत जेजुरी पोलिसांत तक्रार दिली असून, वांडेकर यांनी त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करून, मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा खळबळजनक आरोप वांडेकर यांच्यावर करण्यात आला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका राष्ट्रीय पक्षाची जेजुरी येथील कार्यकर्ती आहे. या महिलेने फिर्याद दिली असून, वांडेकर यांनी त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. दिनांक ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वांडेकर यांनी फोन करून या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या पतीला दिली. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फिर्यादीनंतर जेजुरी पोलिसांत वांडेकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्ष पद भूषविलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा होत आहे. या घटनेचा अधिक तपास जेजुरी पोलीस करीत आहेत.