लोणावळा (पुणे) : माणूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी बालपण, सवंगडी, शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींच्या सहवासात घालवलेले दिवस आणि गमतीजमती कधीच विसरू शकत नाही. अशाच कॉलेजमधील दिवसांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मावळ विद्या प्रतिष्ठान संचलित अध्यापक विद्यालय औंढे खुर्द, लोणावळा (ता. मावळ) येथील २०१०-११ च्या बॅचच्या मुलांचे तब्बल १३ वर्षांनी स्नेहसंमेलन पार पडले.
औंढे खुर्द, लोणावळा (ता. मावळ) येथील अध्यापक विद्यालयात २०१०-११ मध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र जमले होते. या वेळी प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले. आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले. १३ वर्षांनंतर पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र भेटल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. मनात साठवून ठेवलेल्या शालेय जीवनातील आठवणींना मनसोक्त गप्पांच्या माध्यमातून मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिता बारसे यांनी भूषविले. आयोजनासाठी गणेश उगले, संदीप सावंत, शंतनू बिले, अंजली जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मावळ विद्या प्रतिष्ठान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा देशमुख, संस्थेचे अध्यक्ष संदीप देशमुख, शिक्षक शांता मंडले, देवराम पवार, श्रीहरी पावशेरे, भोसले, काळे, वनिता येवले, गराडे, प्रफुल्ल ओहोळ, अमोल घनवट यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत कमी दिवसांमध्ये नियोजन समितीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करून देखील आपापल्या कामामध्ये व्यग्र असणारे माजी विद्यार्थी आपल्या जुन्या मित्र मंडळींना भेटायला आणि कॉलेजमधील शिक्षकांप्रती आदर व्यक्त करायला या स्नेह मेळाव्यात सहभागी झाले होते. या वेळी प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले. आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्वत्र विखुरलेले विद्यार्थी एकत्र आले होते. शालेय जीवनातील काही गमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात सहभागी शिक्षकांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे नियोजन समितीच्या विद्यार्थ्यांनी आभार मानले. समुह भोजन केले व वंदे मातरम् म्हणून या सोहळ्याचा समारोप झाला.