केडगाव: बारामती लोकसभा निवडणुकीला आता काही दिवसच शिल्लक राहिले असल्यामुळे मतदारसंघांतील सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार बैठका सुरू आहेत. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी देखील बैठकांचा धडाका लावला असून त्यांची दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, बारामतीच्या खासदारांनी गेल्या 15 वर्षांत मला विचारून एक रुपयाही निधी दौंडला दिला नाही. मी जे सुचवलं ते काम त्यांनी केले नाही. त्या नेहमी तालुक्यांतील दोन-चार जणांचे ऐकून तुटपुजा निधी टाकला जायचा. त्यांनी कोणत्याही मतदाराचे काम केले नाही. नेमके याउलट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामाचे माणूस आहेत. त्यांनी मागेल तिथे भरघोस असा निधी दिला. अडचणीत आपल्या पाठीशी उभे राहिले म्हणून अजित पवार यांच्यासारख्या विकास पुरुषाची महाराष्ट्राला गरज आहे. म्हणून सर्वांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना भरघोस मताने निवडून देऊन खासदार करायचे आहे. आपल्या विचारांचा खासदार असेल तर निधीची कमतरता अजिबात पडणार नसल्याचे देखील रमेश थोरात म्हणाले.
या बैठकीत पुढे बोलताना रमेश थोरात म्हणाले की, मी आणि आमदार राहुल कुल आता हे एकमेकांना पेढे भरवत आहे. त्यामुळे तुम्हीपण आता एक होऊन गट-तट न करता कामाला लागा. आता आपण सगळे एक झालो आहोत. यानंतर मात्र कार्यकर्त्यांमध्ये हस्या पिकला.
पावसाळ्यातील छत्री प्रमाणे काही ओबीसी नेते उगवतात
यावेळी बोलताना बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ म्हणाले की, पावसाळ्यात छत्री उगवल्याप्रमाणे काही मंडळी(ओबीसी पर्व) निवडणुकीच्या तोंडावर उगवतात. जाती-पातीवर राजकारण करतात आणि आपली पोळी भाजून घेतात. पण, अडचणीच्या वेळी ही मंडळी गायब होतात, त्यावेळी मात्र आपल्याला दादा किंवा आप्पाकडेच जावे लागते आणि अडचण सोडवावी लागते. त्यामुळे ओबीसी बांधवांनी जातीपातीचा विचार न करता व चुकीचा निर्णय न घेता महायुतीच्या उमेदवाराला भरघोस असे मतदान करावे. कारण हीच माणसे आपल्या कामाला येणार आहेत.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात, बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ, दौंड खरेदी विक्रीचे संचालक मोहन टूले, माजी संचालक शंकर टूले, माजी उपसरपंच सतीश टूले, मोहन टूले, देलवडी वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन रामकृष्ण टूले, बापूराव बरकडे, प्रवीण टूले,तुकाराम टूले, बापू टूले, जगदीश महारनवर, आप्पा टकले आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते