पुरंदर: बोपदेव घाटात झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना पत्र लिहले आहे. घाटातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही अत्यावश्यक उपाययोजना करण्याची मागणी शिवतारे यांनी सदर पत्रात केली आहे.
शिवतारे यांनी आपल्या पत्रात या घटनेचा उल्लेख करीत हा भाग आपल्या पुरंदर हवेली मतदारसंघात येत असल्याचे म्हटले आहे. याबाबत शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रात्रीच्या वेळी बोपदेव घाटात मोठ्या प्रमाणात युवक व युवती आढळून येतात. घाटात रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या कट्ट्यांवर बसून अनेक जोडपी येथे मद्यपान करताना पाहायला मिळतात. येथे वर्दळ वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे घाटात असलेले अंधाराचे साम्राज्य आणि रात्रीच्या वेळी आजूबाजूला असलेला निर्मनुष्य परिसर. असाच काहीसा प्रकार दिवे घाटाच्या परिसरात देखील असतो. कधी कधी या भागात बिबटे थेट रस्त्यावर येतात. या गोष्टी लक्षात घेऊन या दोनही घाटात काही तातडीच्या उपाययोजना पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी यांना सुचविल्या असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
बोपदेव घाट आणि दिवे घाटासाठी जिल्हा नियोजन समितीकडून स्ट्रीट लाईटसाठी तातडीने निधी मंजूर करून घाट रस्त्यावर व आजूबाजूला प्रकाशाची व्यवस्था करावी. घाटात प्रकाशव्यवस्था असेल, तर जोडपी किंवा मद्यपी याठिकाणी उगाच रेंगाळणार नाहीत. याशिवाय दोनही घाटांच्या पायथ्याला किंवा सुरुवातीला पोलीस चौकी उभारून तिथे रात्रीच्या वेळी पोलीस उपलब्ध राहतील, अशी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही शिवतारे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
घाटाच्या परिसरात नियमित पोलिसांचे पेट्रोलिंग सुरु झाल्यास हे लोक घाटात हैदोस घालणार नाहीत. त्यामुळे पोलीस चौकी उभारण्याबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांनी काळजी घ्यावी
दरम्यान झालेल्या घटनेबाबत संताप व्यक्त करीत शिवतारे म्हणाले, या रस्त्यावर दोन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांनी घाट परिसरात रात्रीच्या वेळी फिरण्यास विद्यार्थ्यांना मज्जाव करावा, यासाठी कॉलेज प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे, शिवतारे यांनी म्हटले आहे.