पुणे : पुणे रेल्वे स्थाकनामधून अन्य शहरात पार्सल पाठविण्याचे प्रमाण अधिक आहे. आता पुण्याहून रेल्वेद्वारे वाहतूक होणा-या प्रत्येक पार्सलचे स्कॅनिंग होणार आहे. पुणे स्टेशनवरील पार्सल कार्यालयात 25 लाख रुपयांचे स्कॅनिंग मशीन बसविण्यात आले आहेत. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे स्टेशनवरील पार्सल कार्यालयात असलेली ही स्कॅनिंग मशीनची विशेष बाब म्हणजे ही स्कॅनिंग मशीन रेल्वे प्रशासनाने नाही तर स्थानकावर काम करणाऱ्या हुंडेकऱ्यांनी वर्गणीतून गोळा केलेल्या रकमेतून घेतले आहे. पुणे स्थानकावरच नाही तर देशात पहिल्यांदाच एखाद्या स्थानकावर वर्गणीतून स्कॅनिंग मशीन बसविल्याचा दावा पुणे रेल्वे प्रशासनाने केला आहे. दोन सेकंदात एक पार्सल स्कॅन करण्याची या मशीनची क्षमता असल्याचे बोलले जात आहे.
पुणे स्थानकावरुन दररोज सुमारे पाच हजार पार्सलची वाहतूक होते. गेल्या काही वर्षात देशातील विविध स्थानकावर पार्सलच्या माध्यमातून मोठे गैरप्रकार घडले आहे. मात्र, आता पुणे स्थानकावर अत्याधुनिक स्कॅनिंग मशीन बसविल्याने येणा-या व जाणा-या सर्व पार्सलची तपासणी होणे सहज शक्य होणार आहे.
मंगळवारी (दि. 4) रोजी स्कॅनिंग मशीनचे उद्घाटन पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी.के. सिंग, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियांका शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी पुण्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मिलींद हिरवे म्हणाले, पुणे स्थानकावरील पार्सल कार्यालयात पार्सल स्कॅनर मशीन बसविण्यात आले आहे. हुंडेकरी असोसिएशनने स्वखर्चातून हे मशीन बसविले आहे. मंगळवारपासून त्याचा वापर सुरु झालेला आहे.