पुणे : राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदारसंघात नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरातील व्यावसायिक दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १९८ शिरूर, २०२ पुरंदर, २०३ भोर, २०८ वडगाव शेरी, २०९ शिवाजीनगर, २१० कोथरूड, २११ खडकवासला, २१२ पर्वती, २१३ हडपसर, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट, २१५ कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात एकूण ७१६ मतदान केंद्रे (इमारत) मधील ३ हजार ३३१ बुथवर मतदान होणार आहे.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व आस्थापना, दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) मध्यरात्री १२ ते २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिले आहेत. तसेच निवडणूक आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीप्रमाणे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल घेऊन जाण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. यासोबत मतदान केंद्रात फोटोग्राफी अथवा व्हिडिओग्राफी करण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे.