उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत सेवा रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे आणि बंद असलेले चेंबर यामुळे कस्तुरी मंगल कार्यालयाच्या बाजूला व होंडा शोरूमच्या समोर दोन्ही ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे वाहतुकीची गैरसोय होत आहे, तसेच दुकानदारांना यामुळे दुकाने बंद ठेवावी लागत आहेत.
रस्त्याच्या कडेला दुकाने आहे. मात्र पाण्यामुळे दुकाने उघडता येत नसल्याने दुकानदरांमध्ये व सेवा रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
पावसाचे पाणी जाण्यासाठी बंद असलेले चेंबर यामुळे उरुळी कांचन येथील इरीगेशन कॉलनी, चौधरी माथा, हरणा कॉम्प्लेक्स समोर व उरुळी कांचन पोलीस ठाणे परिसरात पाणी साचत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण आणि वाहतुकीच्या गैरसोयी बाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
उरुळी कांचनसह परिसरात रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहेत. स्थानिक दुकानदारांनी स्वत:च्या दुकानासमोर मुरूम भरल्यामुळे पावसाचे पाणी तुंबत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारलाईन नसल्यामुळे तसेच नैसर्गिक प्रवाह नष्ट केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे. पाऊस पडल्यानंतर नागरिकांना या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे या ठिकाणी गटारलाईन व चेंबर बांधण्यात यावा, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
दरम्यान, टोलनाका सुरु होता त्यावेळी रस्त्याची डागडुजी करण्यात येत होती. मात्र, टोलनाके बंद झाल्यामुळे सेवा रस्ते, अतिक्रमण अशी कामे अजूनही झाली नाहीत. तसेच महामार्गाचा कोणताही अधिकार ग्रामपंचायतीला ठेवलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन्ही बाजूने गटारलाईन करून घाव्यात असे निवेदनही देण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा सक्षम गटारलाईन, पाणीवाहक नाही तसेच जागा मालकांनी व्यापाऱ्यांना जागा भाडे तत्वावर दिल्या. त्यामुळे मुरूम भरल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन म्हणाले, “उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागील वर्षी नव्याने मोऱ्या केल्या आहेत. मात्र अचानक पाऊस आल्याने हे पाणी रस्त्याच्या बाजूला साचत आहे. पावसाळ्यापूर्वी होणारी कामे महामार्गाच्या ठेकेदाराने करुन घ्यावीत. तसेच बुजलेल्या चाऱ्यात अडकलेली माती काढून पाणी जाण्यासाठी वाट काढून देण्यात यावी.”
याबाबत बोलताना कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे म्हणाले, “महामार्गावरील सेवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरींची कामे ही अंत्यत निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. ठिकठीकाणी खड्डे पडले असून पावसळ्यात मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार आहे.”
याबाबत बोलताना महामार्गाचे ठेकेदार किशोर बिरंगे म्हणाले, उरुळी कांचन परिसरात साचत असलेल्या ठिकाणची पाहणी करण्यात आली असून पाणी काढण्याचे काम सुरु आहे. तसेच पावसाळा सुरु होण्याअगोदर लोणी काळभोर ते यवत ग्रामपंचायत हद्दीतील कासुर्डी पर्यंत महामार्गावरील कामे ही पूर्ण केली जातील.