पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ मध्ये होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी कारखानास्तरावरील मतदारांच्या प्राथमिक मतदारयादीचे काम पूर्ण झाले आहे. पुणे विभागाच्या जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी कारखान्याच्या प्राथमिक मतदारयादीची अर्हता निश्चित केली आहे. १ आॉक्टोबर २०२३ या अर्हता दिनांकाला अनुसरून संस्थेने सादर केलेल्या पात्र सभासद मतदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे.
कारखान्याने संस्था सभासदांसाठीचे ठराव देण्यास २० ऑक्टोबरपासून सुरुवात केली होती आणि ते २१ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात आले. त्यानुसार मुदतीत २४६ संस्थांचे ठराव प्राप्त झाले. दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या अर्हता दिनांकावर (कट ऑफ डेट) प्राथमिक मतदार यादीचे काम पूर्ण झाले आहे.
अंतिम मतदारयादी १७ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध होणार
मतदारांची प्रारूप मतदारयादी २६ डिसेंबर रोजी सकाळी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप मतदारयादीवर हरकती वा आक्षेप दाखल करण्याची मुदत आजपासून ३ जानेवारीपर्यंत ठरविण्यात आली आहे. दाखल झालेल्या हरकतींवर १२ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल. तर अंतिम मतदारयादी १७ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
२१ हजार ४१४ सभासदांचा प्राथमिक यादीत समावेश
मुंबई उच्च न्यायालयातील दाखल याचिका क्रमांक ४७६२ दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजीचा आदेश आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या ११ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये यशवंत कारखान्याच्या प्राथमिक मतदार यादीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी आणि संस्था सभासद मिळून एकूण २१ हजार ४१४ सभासदांचा प्राथमिक यादीत समावेश आहे.
निवडणूक रंगणार
हवेली तालुक्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखान्याचा समावेश होतो. आर्थिक अडचणीमुळे २०११-१२ पासून हा कारखाना बंद आहे. या कारखान्याचे अवसायन शासनाने रद्द केल्यानंतर प्रशासकीय समिती गठित करण्यात आली. सभासदांच्या हाती कारखान्याचा कारभार देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यानंतर निवडणूक कार्यक्रमाबाबतचा निर्णय घोषित होणे अपेक्षित मानले जात आहे. त्यामुळे तब्बल दिड दशकानंतर या कारखान्याची निवडणूक आता रंगणार आहे.