युनूस तांबोळी
शिरूर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात गावांतील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. वाघोली गावातील समस्या गंभीर असून देखील पायाभूत सुविधा नसल्याने सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. या आवश्यक सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विधानसभेच्या पायरीवर सोमवारी (ता. १८) आंदोलन केले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेली मतदारसंघातील पुणे-नगर महामार्गावर वाघोली हे ३.५ लाख लोकसंख्या असलेले गाव आहे. नगर-पुणे महामार्गावरील या गावातून औरंगाबाद या शहराला जोडणारा मार्ग जातो. मात्र, येथे अद्यापही चांगले रस्ते नाहीत. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना दोन-दोन तास येथे ताटकळत थांबावे लागते. या महामार्गावर उड्डाणपूल होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले होते. परंतु याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही.
या परिसरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. लोकांना पाणी मिळत नसल्याने कोट्यवधी रूपये टॅंकरवर खर्च करावा लागत आहे. या परिसरात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागल्यावर हळूहळू इतरही प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शासनाने या परिसराकडे लक्ष द्यावे. त्यातून येथील नागरिकांच्या पायाभूत सुविधा सोडविल्या जाव्यात, यासाठी पवार यांनी नागपूर येथील विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता.