उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, साडे अकरा तोळ्याचे सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 4 लाख 75 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. (आताच्या बाजार भावाप्रमाणे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील टिळेकर वस्ती परिसरात बुधवारी (ता. 17) मध्यरात्री हि घटना घडली आहे.
याप्रकरणी प्रशांत तुळशीराम टिळेकर (वय -45, रा. टिळेकर वस्ती, बायफ जवळ, उरुळी कांचन ता. हवेली) सध्या अष्टविनायक सोयायटी, गजानन महाराज मंदिरासमोर फुरसुंगी ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिळेकर कुटुंबीय घरात नसताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कोयंडा कशानेतरी तोडुन घरात प्रवेश केला. यावेळी बेडरुम मधील लोखंडी कपाटातील ड्राव्हरमध्ये असलेले रोख रक्कम 15 हजार व तब्बल 4 लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.