पुणे : महाराष्ट्रात विजेचे दर वाढणार असून महावितरण आजपासून शॉक देण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी राज्यातील वीज ग्राहकांच्या वीज बिलात जवळपास ७.५० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार अजून वाढणार आहे. ही दर वाढ आज सोमवार (१ एप्रिल)पासून लागू होणार आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात महावितरण विजेच्या दरांत १० टक्क्यांची वाढ करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महावितरणच्या या दरवाढीचा फटका घरगुती वीज ग्राहकांपासून, शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक कंपन्यांनाही बसणार आहे. गेल्या वर्षी देखील दरवाढ केल्याने वीज बिलात सव्वा सात टक्क्यांची सरासरी वाढ झाली होती. आता पुन्हा यंदाच्या आर्थिक वर्षात साडे सात टक्क्यांची सरासरी वाढ होणार आहे.
० ते १०० युनिटपर्यंत वीज दरात कोणतीही वाढ केली जाणार नसून १०१ ते ३०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांना वीज दर १०. ८१ रुपयांवरून ११.४६ रुपये प्रति युनिट आकारला जाणार आहे. तर ५०१ ते १००० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांना १६.७४ रुपयांवरून १७.८१ रुपये वीज दर आकारला जाणार आहे.
गतवर्षी महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दरवाढीसंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानुसार आयोगाने ही याचिका मंजूर करून दिलेल्या आदेशानुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे. मागील आर्थिक वर्षातही विजेच्या बिलात प्रतियुनिट सरासरी ७.२५ टक्के वाढ झाली होती. तसेच येत्या आर्थिक वर्षात (२०२४-२५)विजबिलात प्रतियुनिट७.५० टक्के अशी वाढ होणार आहे.