राजगुरुनगरः खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाच्या हालचालींना वेग आला आहे. सभापती कैलास लिंभोरे आणि उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्तर पुणे जिल्हातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या बाजार समितीचा सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवार २८ रोजी सभापती, उपसभापती यांची निवड होणार आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नवीन सभापती व उपसभापती निवडीसाठी दि. २८ रोजी विशेष सभा घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सचिन सरमळकर यांनी दिली. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे हे काम पाहणार आहेत. शनिवारी सकाळी सव्वा अकरा ते पावणेबारा यावेळी नामनिर्देशनपत्र (अर्ज) वाटप व स्वीकृती, दुपारी बारा वाजून पाच मिनिटापर्यंत अर्जाची छाननी, छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्राची यादी जाहीर करणे, नामनिर्देशन पत्राची माघारी आणि दुपारी १२.२६ वा. अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणे, दुपारी साडेबारा ते एक या वेळेत आवश्यकतेनुसार निवडणूक मतदान प्रक्रिया, मतदानानंतर लगेचच मतमोजणी प्रक्रिया, मतमोजणीनंतर लगेचच निवडणूक निकाल घोषित केला जाणार आहे.
शेतकऱ्यांची संस्था असलेल्या खेड बाजार समितीची निवडणूक दीड वर्षापूर्वी अत्यंत चुरशीने झाली. त्यात आमदार दिलीप मोहिते पाटील विरोधात सर्वपक्षीय असे दोन पॅनेल होते. आर्थिक वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही निवडणूक जिल्ह्यात गाजली. निकालात आमदार मोहिते पाटील गटाला १० आणि विरोधकांना ६ जागा मिळाल्या होत्या. व्यापारी मतदार संघाच्या दोन संचालकांपैकी एक आमदार मोहिते पाटील यांच्याकडे, तर एक विरोधकांकडे गेले. त्यामुळे ११ विरोधात ७ असे बलाबल झाले. सभापतीसाठी अशोक राक्षे, हनुमंत कड, विनोद टोपे, जयसिंग भोगाडे यांची नावे चर्चेत असून विरोधी गटाचे विजयसिंह शिंदे पाटील सभापतीपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.