पुणे: उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवाव्यात. अवैधरीत्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर विविध पथकांच्या माध्यमातून कडक लक्ष ठेवण्यात यावे. जिल्हा नियत्रंण कक्षात येणाऱ्या तक्रारी दैनंदिन निकाली काढून अहवाल सादर करावेत. सर्व बाबतीत सहायक खर्च निरीक्षक यांच्याशी संपर्कात राहून निवडणूक कामकाज पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय खर्च निरीक्षक उमेश कुमार यांनी केले.
निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतर्गत खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, ए. वेंकादेश बाबू यांनी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, सी- व्हिजिल आणि निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन कक्षातील कामकाजाचा आढावा देखील घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक खर्च सोनाप्पा यमगर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होते. वेंकादेश बाबू म्हणाले की, संवेदनशील मतदारसंघांमध्ये एक भरारी पथक (एफएसटी) व एक स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) वाढवावे. या सर्व पथकांचे तीन पाळीमध्ये काम होईल, याची दक्षता घ्यावी.
डॉ. सुहास दिवसे म्हणाले की, जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एफएसटी, एसएसटी, व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून, दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आपापल्या मतदारसंघात कामे करीत आहेत. या आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.