केडगाव (पुणे) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर दौंड तालुक्यातील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या खुटबाव शाळेमध्ये आज सोमवार पासून (ता. 22) ते रविवारपर्यंत (ता. 28) शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेमध्ये केले जाणार आहे.
पहिल्या दिवशी पाणी कसे वाचवायचे आणि इतरांना कशी मदत करायची, या विषयावर आधारित पोस्टर बनविणे, तसेच विज्ञान, गणित या विषयावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. सर्व गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी पाणी आडवा पाणी वाचवा, जल है तो कल है, पाण्याचे संवर्धन करा अन् मुलाचे भविष्य सुरक्षित करा, पर्यावरण रक्षणाची धरा कास तरच होईल मानवाचा विकास, अशा अनेक घोषणा देण्यात आल्या.
यासोबतच शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्टॉलदेखील मांडण्यात आले होते. पुढील दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाइफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस आणि समुदाय सहभाग दिवस असे सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती नवनाथ थोरात यांनी दिली आहे.
यात सर्व शिक्षक, विद्यार्थी त्यासोबतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संबंधित असलेले विविध संस्था भागधारक यांचादेखील समावेश होणार आहे. शिक्षण सप्ताहाचे एकूण नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढरे, सचिव सूर्यकांत खैरे, खजिनदार अरुण थोरात, मुख्याध्यापक जगताप, तसेच सर्व अध्यापक वर्ग यांनी मार्गदर्शन केले आहे.